सांजवार्ता
Date: 29/11/2026
साहित्य
बारावे अंबाजोगाई साहित्य संमेलन १२-१३ डिसेंबर रोजी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या वतीने येत्या १२ व १३ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे १२ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंदुमती जोंधळे व स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे या आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.
संमेलनाचे उद्घाटन शनिवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते वृक्षदिंडी व वृक्षारोपणाने होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष इंदुमती जोंधळे, स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे, प्रमुख पाहुणे कौतिकराव ठाले पाटील, बालाजी सुतार, दगडू लोमटे, डॉ. राहुल धाकडे उपस्थित राहणार आहेत.
चित्र-पुस्तक प्रदर्शन
याप्रसंगी मुखपृष्ठ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. क्रांती व आविष्कार एडके हे अंबाजोगाईचे गौरव गीत सादर करतील. यावेळी अध्यक्षपदाचे सूत्र हस्तांतरण, पुस्तक प्रकाशन व स्मरणिकेचे प्रकाशन, पुरस्कार वितरण होईल.
संमेलनस्थळाला चित्रकार दिलीप बडे यांचे नाव
बीड बायपासवरील एमआयटी संकुलात होणाऱ्या संमेलनस्थळाला चित्रकार दिलीप बडे साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. व्यासपीठाला नाट्यकर्मी चंदू सोमण यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनात चित्रकार दिलीप बडे, सोनकांबळे गुरूजी, राजन रामदासी यांच्या चित्रांचे प्रदर्शन, अन्य चित्रे व छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच अंबाजोगाईच्या लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे व तेथे सेल्फी पॉइंटही असेल, असे संयोजकांनी कळवले आहे.
अंबाजोगाईवर परिसंवाद
दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात प्रा. डॉ. दिलीप घारे व सोनाली भगरे हे आंब्याचे गोंधळी हा कार्यक्रम सादर करतील. यावेळी अमोल देशमुख यांचे गायन, नवोन्मेष अंतर्गत वैभव काळे व ओंकार रापतवार हे कार्यक्रम सादर करतील. रविवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी १०
वाजता 'अंबाजोगाई : काल आज उद्या' या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात विश्वास तांबोळी, अमर हबीब व कल्पना लोहिया हे सहभागी होणार आहेत. दुपारी १ वाजता कवी-गीतकार दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुपारी ३ वाजता संमेलनाध्यक्ष इंदुमती जोंधळे यांची मुलाखत प्रा. डॉ. शैलजा बरूरे व हर्षवर्धन दीक्षित हे घेतील.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














